महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, यांच्या मालिकेत बसणारे अर्वाचीन काळातील संत कृष्णदास महाराज, एक प्रसिध्दी पराड्र. मुख असणारे थोर संतपुरुष होय.
संत कृष्णदासांचा जन्म घोडगेवाडी, दोडा मार्ग, ता. चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथे नवरात्रीच्या घटस्थापनेदिनी दिनांक ११/१०/१९२३ रोजी संध्याकाळी झाला. त्यांचे वडील श्री. विष्णू शहाजी देसाई आणि आई सौ. लक्ष्मीबाई (भागिरथी) या दांमपत्यापोटी जन्म झाला. त्यांचे जन्म नाव येसाजी. त्यांच्या घराकडे गावची पाटीलकी होती, एक सधन कुटुंब, दानशूर, प्रेमळ स्वभाव असे त्यांचे माता- पिता.
त्यांना बालपणापासून भक्तीची आवड होती. बालवयात शेजारच्या लहान सवंगडयांना घेऊन ते जंगलात जाऊन रामकृष्णहरि भजनांत दंग होऊन जात. ग्रंथ वाचणाची आवड होती, साधुसंतांच्या भक्तीकथा श्रवण करणे, एकांतात बसून चिंतन करणे व रात्री प्रेमळ आईच्या कुशीत निद्रा घेणे असा त्यांचा परिपाठ होता.
महाराजांना अन्यायाची चीड होती. इंग्रजांच्या पाशवी अत्याचारामुळे जनता त्रस्त होती. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक भूमीगत स्वातंत्र्यवीर तळहातावर शीर घेऊन रात्रंदिन झटत होते. महाराजांचा पिंड जसा भक्तीचा होता, तसा चळवळीचाही होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे तनमन आक्रंदू लागले ववयाच्या सोळाव्या वर्षी क्रांतीकारक बनून ते घराबाहेर पडले. सहा वर्षे अपार कष्ट केले आणि ईश्वरकृपेने भारतदेश स्वतंत्र झाला.
त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवामुक्ती संग्राम यातही अग्रेसर राहिले. गोवा मुक्ती साठी त्यांनी स्वतःचे अपार धन खर्च केले व गोवाही मुक्त झाला. त्यांचे सहकारी सरकारमध्ये मंत्री झाले. ते स्वार्थाने आपलाच विचार करतात, कार्यवाह लोक लबाड निघाले, त्यांनी महाराजांना फसविले, ही अनिती पाहून त्यांना दुःख झाले. व कुणासही न सांगता अंगच्या वस्त्रानिशी बाहेर पडले.
हे देवा तुजशिवाय मला दुसरे काहीही नको, धनमान, कीर्ति, संपदा, लौकीक नको मला तूच हवास या ध्यासानी ते पंढरपूरक्षेत्री गेले. त्यांनी आता देवाची भक्ती करून देवप्राप्ती करण्याचा दृढ संकल्प केला. अयाचित व्रत म्हणजे कोणापाशी, काहीही, कोठेही अगदी जीवावर बेतले तरी मागायचे नाही असे व्रत अंगीकारले. त्यावेळी त्यांना अपार कष्ट, प्रसंगी उपवाशी राहावे लागले.
पंढरपूरहून ते श्री क्षेत्र देहूगांव या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गांवी आले. तेथे तुकाराम गाथेचा अभ्यास करण्यासाठी भंडारा डोंगरावर वस्ती केली. 'होऊनिया तुकादास केला गाथेचा अभ्यास', तुकाराम गाथेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तुकादास हे नांव धारण केले.
तदनंतर ते आळंदी क्षेत्री आले. मिळाले तर खाणे अन्यथा उपवास करावा, आपल्या अयाचितव्रताला बाधा येऊ दिली नाही. आळंदी येथे सकाळी लवकर उठून इंद्रायणी नदीमध्ये स्नान करावे आणि संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधी मंदिरात ध्यान करावे, मौनात हरिपाठ करावा, सतत चिंतन, मनन,निदिध्यासन करावे, ग्रंथ वाचन, श्रवण करावे, अत्यंत आचारशील, पवित्र धारणा असा त्यांचा नित्यक्रम झाला.
महाराज आळंदीत भक्तीमार्गाने वाटचाल करीत होते. सन १९५८ साली श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी मंदिरात सकाळी आठ वाजता त्यांना भगवान श्री गोपालकृष्णाचे सगुण निर्गुण स्वरुपात प्रत्यक्ष दर्शन झाले. आणि त्यांनी कृष्णदास हे नाव धारण केले.
अनन्याश्चिन्तयंतोयंतोमाम यो जनाः पर्युपासते । तेषाम्नित्याभियुन्क्तांमामद्व योगक्षेमम वहाम्यहम ।। गीता ९-२२
या श्रीकृष्ण भगवंताच्या वचनाचा त्यांना अनुभव आला. काही न मागे कोणासी । तोचि आवडे देवासी । देव तयासी म्हणावे । त्याचे चरणी लीन व्हावे ।। तु. ।।
अयाचित व्रताच्या अंगिकारामुळे त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. साधना काळात अनेक दुर्धर प्रसंगांना तोंड द्यावे लागले. त्यावेळी एका प्रभूशिवाय आपला कुणीही रक्षणकर्ता नाही याची प्रचिती आली.
ईश्वराच्या भेटीसाठी त्यांनी एकांतवास स्विकारला. ते जनसंपर्का पासून दूर अशा भंडारा, भामगिरी, घोरवडा इत्यादि ठिकाणी रानावनात निर्जन स्थळी राहिले. आपणांस निबीड एकांतवास मिळावा म्हणून ते भिमाशंकर दर्शनासाठी गेले. तेथे काही सज्जनानी त्यांना तळेकरवाडी, सालगांव, येथे आणले. तळेकरवाडीतील लोकांनी त्यांना वाडीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात राहू दिले. काही वर्षानंतर महाराज तळेकरवाडीतील श्री नामदेव तळेकर यांच्याशेतघरात राहू लागले. हे शेतघर म्हणजे गाईचा गोठा, अत्यंत एकांत स्थळ, तेथे महाराज रात्रंदिन साधनेत मग्न झाले.
जयाशी एकांत मानवला। सर्वा आधी कळे तयाला ।। बहु एकांतावरी प्रिती । जया जनपदाची खंती ।। जाण मनुष्याकारे मुर्ती। ज्ञानाचि तो ।। ज्ञाने. १३-६१३
ज्ञानोत्तर भक्तीमध्ये रममाण, नित्य स्वरुपी निमग्न, स्वयंप्रकाशांत वास, त्यांचा अखंड अजपाजप सुरु असल्याने कर्माकर्माचा क्षय होऊन ते स्वयं परमेश्वर स्वरुपाला पात्र झाले.
शुर ओळखावा रणी । साधु ओळखावा मरणी ।। महाराजांनी नागपंचमी, दिनांक ११/८/१९९४ रोजी 'रामकृष्णहरि' मंत्राचा त्रिवार जप करुन आपला पावन देह 'श्रीकृष्ण चरणी अर्पण केला.' त्या निमीत्ते त्यांचे भक्त प्रतिवर्षी महाराजांचा समाधी सोहळा नागपंचमीदिनी भक्तीभावाने साजरा करतात.
Copyright © 2024 santkrushnadasmaharajtalekarwadi - All Rights Reserved.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.